सर म्हणाले, "उद्या तुमची शाळेबाहेरची शाळा असणार आहे." मला प्रश्नच पडला, कशी असेल शाळेबाहेरची शाळा !
नमस्कार, मी स्वरा प्रफुल गणवीर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महाबळा येथे शिकते. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे शाळेबाहेरची शाळा म्हणजे आमच्या शाळेची क्षेत्रभेट होय सोबतच वनभोजन सुद्धा होते कारण ही क्षेत्रभेट आमच्या गावातील मा. सरपंच यांच्या शेतात घेतलेली होती.
शेतामध्ये वनभोजन करायचे व तेथेच आपली शाळा भरणार म्हणून आम्ही सकाळी शाळेत लवकर आलो. तसेच सोबत दप्तर आणायचे नाही असे सरांनी सांगितलेले होते, म्हणून आम्ही दप्तर आणले नाही. शाळेतून मॅडमनी आम्हाला क्राफ्टचे काही साहित्य दिले. यामध्ये क्राफ्ट पेपर, स्केच पेन, कैची, गोंद, कोरे कागद असे अनेक साहित्य होते. शाळेचा परिपाठ झाल्यानंतर आम्ही क्षेत्रभेटीसाठी निघालो. क्षेत्रभेटीला जात असताना आम्हाला वाटेमध्ये अनेक शेत, नाले, झाडे, शेतातील गोठे, शेतात काम करणारी बाई - माणसे दिसली. शेवटी आम्ही शेतामध्ये पोहोचलो. सरांनी आधीच मोठ्या कडुनिंबाच्या झाडाखाली चटई टाकून ठेवली होती. आम्ही धावत जाऊन तिथे गोलाकार बसलो. थोडावेळ आजू-बाजूला बघितले. शेतातून समृद्धी हायवे दिसत होता त्या हायवेवर मोठे - मोठे वाहने, गाड्या जाताना दिसत होत्या. समृद्धी हायवे बाकी हायवे पेक्षा उंच दिसत होता. यानंतर आम्ही मॅडमने दिलेले क्राफ्टचे साहित्य बाहेर काढून सरांच्या व मॅडमच्या मार्गदर्शनाने ग्रीटिंग कार्ड, आकाश कंदील बनवायला सुरुवात केली. आकाश कंदील व ग्रीटिंग कार्ड बनवताना खूप मज्जा येत होती. हे बनवता बनवता कधी दोन वाजले हे आम्हाला समजलेच नाही. आम्हाला खूप भूक लागली होती. आमच्या खिचडी वाल्या मोठ्या आईने आमच्यासाठी मसालेभात, कढी व सोबत जिलेबी आणली होती. जेवण केल्यानंतर शेतामध्ये आम्ही थोडा वेळ फिरलो. तिथे आम्हाला एक पेरूचे झाड दिसले होते पण पेरू कच्चे असल्यामुळे आम्ही ते तोडले नाही. नंतर मॅडमचा मोबाईल घेऊन आजू-बाजूचे फोटो काढले. यानंतर पुन्हा आपल्या जागेवर येऊन राहिलेले काम पूर्ण केले. आमच्या सोबत मॅडम आणि सर हे सुद्धा आकाश कंदील बनवत होते. आकाश कंदील बनवण्याची काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही सर्वांना दाखवले. सरांनी व मॅडमनी आकाश कंदीलाची खूप स्तुती केली. घरी जाण्यासाठी आणखी थोडा वेळ बाकी होता त्या वेळेत आम्ही अंताक्षरी व शब्दांच्या भेंड्या हा खेळ खेळलो. नंतर सर्व साहित्य जमा करून परत जाण्यासाठी निघालो.
अशाप्रकारे आमची शाळेबाहेरची शाळेचा म्हणजे क्षेत्रभेटीचा म्हणजेच वनभोजनाचा दिवस खूप मजेत व आनंदात गेला. हा दिवस आमच्या कायम लक्षात राहील.
Comments